इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण तरीही आमदारांनी आपल्या कामगिरीची मार्केटिंग करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी कार्यवृत्तांत प्रकाशित करण्याची तयारी सुरू केली आहे. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यातील पक्षप्रमुखांना सांगितलेला मंत्र आमदारांसाठी टेंशन वाढविणारा आहे.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली. गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे संकेत दिले. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांनी देखील बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली. पक्षातील दोन केंद्रीय नेत्यांनी लागोपाठ मुंबईत दाखल होऊन बैठका घेतल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. कारण जेपी नड्डा यांनी लोकसभेतील कामगिरीवर विधानसभेची उमेदवारी अवलंबून असणार आहे, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच बदल होण्याची चिन्हे आहेत आणि त्याचे संकेत नड्डा यांनी मुंबई भेटीत दिल्याचे कळते. जे विद्यमान आमदार लोकसभा निवडणुकीत आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील, त्यांचाच विधानसभा निवडणुकीच्या वेळी विचार होणार आहे. त्यामुळे नड्डांनी राज्यातील पक्षप्रमुखांना ‘पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो’ असा मंत्रच दिला आहे.
आमदारांसोबत जेवण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर जेपी नड्डा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची उपस्थिती होती. त्यानंतर जेपी नड्डा यांनी भाजपच्या आमदारांसोबत जेवण केले.
JP Nadda