इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने नेत्रदीपक विजय मिळवला आहे; मात्र तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवर सर्वोच्च नेतृत्वाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. आज रात्री भाजपचे निरीक्षक या तीन्ही राज्यात जाणार आहे. त्यानंतर शनिवार व रविवारी आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्राची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजप तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांची निवड करणार असल्याची चर्चा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नावांची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरा सुमारे साडेचार तास बैठक झाली. तीत तीन राज्यांतील प्रबळ दावेदारांचा विचार करण्यात आला. या बैठकीला मोदी,गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा उपस्थित होते. या बैठकीपूर्वी शाह आणि नड्डा यांनी या राज्यांच्या भाजप प्रभारींसोबत राज्याच्या नेत्यांबद्दल प्रतिक्रिया गोळा करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या.
मध्य प्रदेशमध्ये हे दावेदार
मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, आणि नरेंद्र सिंह तोमर यांच्या व्यतिरिक्त, राज्याचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हे प्रबळ दावेदार आहेत.
राजस्थानमध्ये ही नावे चर्चेत
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठीही अनेक नावे चर्चेत आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल तसेच राजस्थान भाजप अध्यक्ष सीपी जोशी, दिया कुमारी आणि महंत बालकनाथ यांची नावे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून घेतली जात आहेत.
छत्तीसगडमध्ये यातून लागेल वर्णी
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे दावेदार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुणकुमार साओ, विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक आणि माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी यांच्याकडेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भाजप तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांची निवड करू शकते.