इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड : गोरगरीब अशिक्षित आणि बेसहारा महिलांची आजही मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. मराठवाड्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीपासून विभक्त महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तिच्या एका वर्षाच्या मुलाला ५० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ६ जणांविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकारण उघडकीस आले आहे.
ओळखीतून घडला प्रकार
मराठवाड्यात गोरगरीब जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार अनेकदा घडतात आणि उघडकीसही येतात. विशेषतः महिलांची फसवणूक करून त्यांना परराज्यात नेऊन कामाला लावले जाते. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलांची बालकामगार म्हणून देखील विक्री केली जाते किंवा त्यांना अन्य मार्गाला लावले जाते. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
भुलतापांना बळी पडली.
कोमल श्रीराम चव्हाण ( वय २० ) ही माजलगाव तालुक्यातील गोवर्धन गावातील रहिवासी असून तिचे ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र सध्या पतीसोबत विभक्त झाल्याने ती आपल्या आईवडिलांसोबत राहते. तसेच या महिलेला एका वर्षाचा मुलगाही आहे. तिच्या मामाने तिची ओळख छाया देशमुख ( रा. शाहूनगर ) या महिलेशी करुन दिली होती. ही कोमल नावाची गरीब एकदा महिला छाया देशमुखच्या घरी आली असता त्या ठिकाणी तिची किशोर भोजणे ( रा. जिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा ) या तरुणाशी ओळख झाली. हा तरुण आपला मावसभाऊ असल्याचे छाया देशमुखने तिला सांगितले. या दोघांनी महिलेला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देत वर शोधून देण्याची तयारी दर्शवली.तसेच तुझ्या मुलाची सोय लावू असेही तिला सांगण्यात आले. त्यांच्या भुलतापांना ती बळी पडली.
त्यांना सुनावली पोलीस कोठडी
ही बिचारी गरीब महिला त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. यानंतर आणखी दोघांच्या मदतीने तिला घेवून हे सर्वजण कर्नाटकातील हुबळीला गेले. याठिकाणी त्यांनी पिडीत महिलेचा विरोध झुगारुन १ वर्षीय मुलाची ५० हजारात विक्री केली. मुलाची विक्री करुन ते सर्वजण गोव्याला गेले. येथे सर्वांनी चांगली मौज मजा केली. गोव्याहून परत येताना बसमध्ये बसलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला या सर्वांवर संशय आला. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देत बसस्थानकात सर्वांना पकडून दिले. ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झाले. या प्रकरणात छाया व किशोर यांना न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Shocking…Marriage lure…Woman cheating…Sold child for 50 thousand