इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : सत्तेत असलेल्या तीनचाकी सरकारमध्ये कोण कधी नाराज होईल, कोण कुणावर आरोप करेल याचा नेम राहिलेला नाही. सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या अपक्षांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. अशात आता प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपविरुद्ध गरळ ओकली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी अकोला येथे भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले,‘मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. माझे म्हणणे आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावले पाहिजे.
मैत्री न निभावता फक्त कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचे. हे चुकीचे आहे आणि भाजपाकडून असे होऊ नये. भाजपावाल्यांनी वरून खालपर्यंत व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. परंतु, मला वाटते त्यांनी केवळ सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलिकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारल्या पाहिजेत. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग बंद केले पाहिजेत.’
खच्चीकरणामुळे नाराजी
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर त्या भाजपाच्या गोटात सामील झाल्या आहेत. त्यांचे पती रवी राणादेखील भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपा सध्या राणा दाम्पत्याला बळ देत आहे. राणा दाम्पत्याला बळ देत असताना अमरावतीत प्रहार जनशक्ती पार्टीचे खच्चीकरण होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
Finally, Bachu Kadu’s patience has run out… This is a serious allegation against BJP…