इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी अवघ्या ६ ओव्हरमध्येच हा सामना जिंकला. या सामन्यात सामनावीर शुबमन गिल १९ चेंडूत २७ धाव केल्या तर ईशान किशन याने १८ चेंडूत २३ धावा केल्या. अवघ्या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून ईशान किशन आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली व त्यांनीच सामना जिंकला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे.
मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले. या सामन्यात मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगसमोर श्रीलंकाचा अवघ्या ५० धावांवर बाजार उठला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी ५१ धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले.. त्याच्या या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याने श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकात आऊट केले. त्यानंतर मोहम्मद सिराज कमाल केली. मोहम्मद सिराज त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याने यावेळी पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका याला दोन धावांवर रविंद्र जाडेजा याच्या हातून झेलबाद केले.
त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजने सदीरा समरविक्रमा याला शून्यावर तंबूत धाडले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चरिथ असलंका यालाही सिराजने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद केले. लागोपाठ दोन विकेट घेतल्यानंतर सिराज हॅट्ट्रिकवर होता. पण पाचव्या चेंडूवर सिराजला चौकार ठोकला. पण सहाव्या चेंडूवर सिराजने पुन्हा विकेट घेतली. सिराजने धनंजय डी सिल्वा याला ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे सिराजने अवघ्या १ षटकात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतरही सिराजने दोन विकेट आणखी घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्या याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
India won the Asia Cup, defeating Sri Lanka by ten wickets