इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – जरा सर्दी झाली, कणकण वाटली की पॅरासिटामॉल किंवा अँटिबायोटिक्सकडे धाव घेण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. अर्थात पूर्वी घरगुती उपाय करून बघितले जायचे. त्याचा उपयोग झाला नाही तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली जायची. मात्र सर्दी, ताप, खोकला जाणवला की लगेच अँटिबायोटिक्स घेण्यावर भर असतो. पण हे अत्यंत धोकादायक असल्याचे संशोधन मांडण्यात आले आहे. खूप जास्त औषधे घेणे चांगले नाही, असे डॉक्टरही सांगतात.
व्यायाम करा, रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका, कोमट पाणी प्या वगैरे वगैरे डॉक्टर सांगतात. पण तरीही ऑफिसमधून सुट्या मिळणार नाहीत म्हणून, कामे थांबतील म्हणून, आराम करायची सवय नाही म्हणून हायपॉवरचे डोज घेतले जातात आणि त्याच्या दूरगामी परिणामांचा विचारच केला जात नाही. मुळात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याऐवजी आपण गोळ्यांचा भडिमार करून जीवाणूंची रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतो, असे या संशोधनात मांडण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने अलीकडेच केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, भारतीय लोक मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स घेत असल्यामुळे त्यांच्या शरीरातील जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे ते औषधांना दाद देत नाहीत. याचा अर्थ गंभीररीत्या अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर औषधांचा अनुकूल परिणाम न होता, रुग्णाचा जीव धोक्यात येतो. अशा औषधांचा (अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल) गैरवापर हे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे त्याबद्दल खबरदारी घेणं गरजेचे आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
या औषधांचा अतिरेकी वापर
ताप, घसा दुखणे, प्रौढ आणि मुलांमध्ये खोकला असणे यासाठी Azithromycin, सामान्य सर्दी, ताप, कान दुखणे, घसा दुखणे व खोकल्यासाठी Amoxycillin, प्रौढांमध्ये ताप, घसा दुखणं व खोकला यासाठी Amoxycillin, लघवीच्या मार्गावर संसर्ग व अतिसारसाठी सिप्रोफ्लोक्सासिन ही औषधे सर्वसाधारणपणे घेतली जातात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
सहज उपलब्ध होतात म्हणून
अँटिबायोटिक्स सहजपणे उपलब्ध होतात आणि आपण थोडे जरी आजारी पडलो तरी लवकर बरे होण्याच्या अपेक्षेने औषध घेण्याची आपली सवय असते. त्यामुळे लोक योग्य उपचारांऐवजी स्वतःहून अँटीबायोटिक्स घेण्यासाठी मेडिकलमध्ये जातात. शिवाय, अनेकदा ते ओळखीच्या डॉक्टरांना औषधांचा कोर्स लिहून देण्यास भाग पाडतात आणि डॉक्टरांनी नकार दिला, तर ते थेट फार्मासिस्टकडून हवी ती औषधे विकत घेतात.
Got a fever ? Taking antibiotics ? Read this first…