इंडिया दर्पण ऑनलाईन टेस्ट
नेदरलँड संघाने आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव करून क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळात कुणालाही कमी लेखण्यात येऊ नये, असा स्पष्ट संदेश क्रिकेट विश्वाला दिला. या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर नेदरलँडने संघाने प्रभुत्व गाजवून दक्षिण आफ्रिका संघाची वाट अडवली.
टी२० विश्वचषक स्पर्धेत याच नेदरलँड संघाने २०२२ मध्ये देखील दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यानंतर आयसीसीच्या आणखी एका मोठ्या इव्हेंटमध्ये, नेदरलँडने कामगिरीची पुनरावृत्ती आज धर्मशाळा येथे केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी नेदरलँड समोर अक्षरशः नांगी टाकली. डेव्हिड मिलरच्या ४३ धावा आणि अगदी शेवटी शेवटी केशव महाराजच्या चाळीस दावा हेच काय ते यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या डावातले ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल नेदरलँड तर्फे वान डर मर्व याने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले.
दोनच दिवसांपूर्वी अफगान संघाने विश्वविजेत्या इंग्लंडचा पराभव करून २०२३ च्या मोठ्या स्पर्धेत धक्कादायक कामगिरी केली होती. आज नेदरलँडने अफगाण संघाचा कित्ता गिरवला. परंतु या वेळेला बळी ठरला तो चिवट, सक्षम आणि दमदार मानला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ. विश्वचषक स्पर्धेत एकाच आठवड्यात हे दोन चमत्कारिक निर्णय समोर आल्यामुळे आता पुढे आणखी काय होणार? याची उत्कंठा वाढली आहे.
भारतीय खेळपट्या फिरकीसाठी नंदनवन आहेत. अफगाणिस्तान काय किंवा नेदरलँड काय, या दोघांनी याच फिरकीच्या जोरावर दोन मोठे विजय संपादन करुन दाखवले. या दोन्ही संघांनी आता आपल्या देशासाठी हे विजय संपादन करून जवळपास ‘विश्वचषकच’ जिंकला आहे. त्यामुळे त्यांचे वाढलेले मनोबल या पुढच्या सामन्यात आणि पर्यायाने गुणांच्या टेबल मध्ये आणखी किती फेरबदल करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. धर्मशाळाचे वातावरण हे आपल्या जलदगती गोलंदाजांना अनुकूल आहे. म्हणून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे सामन्यात आलेला पावसाचा व्यत्यय आला आणि हा सामना प्रत्येकी ते ४३ षटकांचा खेळविण्यात आला. पहिल्या इनिंगमन्ये नेदरलँडची सुरुवात खराब झाली होती. पहिले ४ बळी अवघ्या ५० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. परंतु नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने ६९ चेंडूत नाबाद ७८ धावांची भक्कम फलंदाजी केल्यामुळे आणि त्याला तळाच्या फलंदाजांनी साथ दिल्यामुळे ४३ षटकात नेदरलँडने ८ गडी बाद २४५ धावा केल्या. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी नेहमीप्रमाणे तिखट होती. परंतु त्यानंतर नेदरलँडच्या फलंदाजांनी या गोलंदाजीवर प्रहार सुरू केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी चांगलीच भरकटली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी २१ वाईट चेंडू वाईड टाकले. स्कॉट एडवर्ड्स नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ३२ ही अतिरीक्त धावांच्या स्वरुपात नेदरलँडला बक्षिस म्हणून मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
दक्षिण आफ्रिकेचे मार्को जॉन्सन आणि केशव महाराज यांचा अपवाद जर सोडला तर जवळजवळ सगळ्याच गोलंदाजाना नेदरलँडच्या फलंदाजांनी चांगलाच प्रसाद दिला. लुंगी एंगेडी, कागीसो रबाडा या दोन मुख्य गोलंदाजांच्या जवळपास प्रत्येक चेंडूवर एक धाव निघत गेली. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचे हे एक मोठे कारण म्हणावे लागेल.
आता उद्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत करून आल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ मैदानावर उतरणार आहे. विश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंडचे आता काय होणार? हे उद्याच्या सामन्यातून स्पष्ट होईल.
Another shock in the World Cup…Netherlands beat mighty South Africa