इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असून आता त्यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विधवा कार्ड वापरले आहे. या इमारतीचा उद्घाटन सोहळा केंद्रातील भाजप सरकारने जोरदार केले, पण त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित केले नाही. त्यामागे विचित्र कारण असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण देशातून त्याचा निषेध करण्यात आला. स्टॅलिन यांनी सनातन धर्म कायमचा संपायला हवा, असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची दखल घेऊन आपल्या पक्षाला सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन केले होते. मोठ्या प्रमाणात वाद झाल्यानंतरही स्टॅलिन यांनी आपले शब्द मागे घेतले नाहीत. आणि आता आणखी एक नवा वाद त्यांनी ओढवून घेतला आहे. आता तर त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याच नावाचा वापर केला आहे.
‘भाजपने राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले नाही कारण त्या विधवा आहेत. हाच आहे का तुमचा सनातन धर्म ?’ असा सवाल स्टॅलिन यांनी केला आहे. ‘संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. भाजपाने तामिळनाडूतून अधीनम बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले नाही. कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म ? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू,’ असे म्हणत तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपावर आणि मोदीसरकारवर टीका केली. उदयनिधी स्टॅलिन हे मदुराईतल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
जुना वाद मिटेना
‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्याचा विरोध करता येत नाही, त्यामुळे तो संपवायला हवा. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,’ असे विधान करून स्टॅलिन यांनी वाद ओढवून घेतला होता. हा विषय ताजा असतानाच त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.
Serious allegations against Modi government