इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सडेतोड भूमिकेबद्दल ओळखले जातात. ज्येष्ठ असो वा कनिष्ठ, छोटा असो वा मोठा… राजकारणात आणि प्रशासकीय यंत्रणेत अजितदादांच्या रफटफ स्वभावाचा परिचय सर्वांनाच आला आहे. आता बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाही त्यांनी शालजोडीतून लगावले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते बाह्य रुग्ण (अपघात) विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवारांनी महाविद्यालयातील वरिष्ठांचा समाचार घेतला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते. अजितदादांनी आपल्या भाषणातून त्यांना कानपिचक्या घेतल्या. बोलता बोलता पहिले तर त्यांनी महाविद्यालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. चुकांसाठी आजपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला मेमो देण्यात आलेला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘डीन, आजपर्यंत तुम्ही एकालाही मेमो दिला नाही. तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर लोक काम कसे करणार? तुम्ही उदारमतवादी आहात,’ असे म्हणत अजित पवारांनी अधिष्ठात्यांचे कान टोचले. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण जास्त आहे अशा तक्रारी आहेत. त्यामुळे डीन यांनी बायोमेट्रिक करण्यास सुरुवात केली पाहिजे म्हणजे शिपायांपासून सगळे बायोमेट्रिक करतील असे स्पष्ट निर्देश अजित पवारांनी दिले.
आता काय कपाळ फोडून घेऊ का?
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के लागल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, ‘एवढं सगळं करुनही बारामतीचा निकाल शून्यच आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का?’ पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले जास्त आहेत. पुरंदर तालुक्यातील एका मुलाने अब्रू राखली आहे. मात्र बारामती, भोर आणि हवेलीचा निकाल शून्य टक्के आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का? आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो आणि बारामतीचा निकाल शून्य लागतो,’ असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
indiadarpanlive