इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते, पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही, हे सांगता येत नाही असे विधान केल्यानंतर त्यावरुन राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यातच काल गृहमंत्री अमित शाह हे मुंबईला आले. त्यावेळेस अजित पवार उपस्थितीत नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. या एकुणच दोन घटनेमुळे महायुतीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
बारामतीत अजित पवार यांनी सांगितले की, आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, पुढे टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.
खरं तर हे स्थानिक संस्थांबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. पण, त्यातून विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यातून ते नाराज असल्याचे तर्क लावण्यात आले. या नाराजींचे कारण काहींनी सांगितले. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले अजित पवार यांचे विधान नैसर्गिक विधान आहे. ते राजकीय विधान नाही, तसेच भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहीत नसते.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या विधानानंतर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी. ते महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे.