इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंद्रपूर – मोठ्या शहरात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यातच परदेशातील शिक्षण म्हणजे दिवास्वप्नच. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणही उंच भरारी घेऊ शकतो, असा आत्मविश्वास असणाऱ्यांपुढे आकाश ठेंगणे असते. असाच अनुभव सावली तालुक्यातील भानापूर येथील आदिवासी लेकीला आला. परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या तिच्या जिद्दीला बळ देण्याचे काम राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे आता एक आदिवासी लेक शिक्षणासाठी लंडनवारी करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे या तरुणीचा शिष्यवृत्तीचा रखडलेला प्रस्ताव मार्गी लागला आणि तिला लंडन येथे उच्च शिक्षणासाठी ३७ लक्ष ६१ हजार १८३ रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मंजूर झाली. ही कहाणी आहे सावली तालुक्यातील भानापूर (पो. पाथरी) या गावातील प्रिया यशवंत ताडाम या तरुणीची. एकतर पूर्णपणे जंगलव्याप्त आणि १०० टक्के आदिवासी गाव. जेमतेम ४० कुटुंबांची लोकवस्ती. अशा या गावातील प्रिया आता एल.एल.एम. करण्यासाठी लंडनच्या क्वीन मेरी युनिर्व्हसिटीमध्ये जाणार आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रियाच्या शिक्षणासाठी ३७ लक्ष ६१ हजार १८३ रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रियाच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव अनेक दिवस रेंगाळत होता. ही बाब भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केला व प्रियाचा परदेशातील उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.
असा आहे आदिवासी लेकीचा प्रवास
प्रिया ताडामचे प्राथमिक शिक्षण आसोलामेंढा (ता. सावली) येथे झाले असून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत तिने जि.प.शाळा पाथरी येथे शिक्षण घेतले. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत सावली येथील विश्वशांती ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण घेतल्यानंतर बी.ए.एल.एल.बी. ची पदवी तिने शासकीय विधी महाविद्यालय नागपूर येथे ७१ टक्के गुणांसह प्राप्त केली.
मुनगंटीवार यांचे आभार
इंटरनॅशनल बिझनेस लॉमध्ये एल.एल.एम. करण्यासाठी प्रिया ताडाम आता लंडनला जाणार आहे. पण, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. तिचे वडील यशवंत ताडाम हे शेतमजूर असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर प्रिया आणि तिच्या कुटुंबियांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
Adivasi young woman to London for education! Scholarship of 37 lakh 61 thousand rupees approved