इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चाळीसगाव – तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (३८) हे सात हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच त्यांनी स्वीकारली. या लाचप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचा-याची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी गुलाब पवार यांनी फोन पेवर १५ हजारांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर पदोन्नतीची थकीत रक्कमेसाठी १२ हजारांची लाच पवार यांनी मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाच घेतांना ते रंगेहात सापडले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या सापळा पथकात जळगाव एसीबीचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदीं होते.