इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुंबईत राहून हिंदुत्ववादी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात बोलणारा मुस्लीम नेता म्हणून सपाचे अबू आझमी यांचा देशभर परिचय आहे. विधीमंडळात अनेकदा कारवाई होऊनही वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवण्यातही त्यांचा हातखंडा आहे. मात्र आयकर विभागाने गेल्या पाच वर्षातील तिसरा दणका अबू आझमी यांना दिला आहे.
अबू आझमी यांच्याशी संबंधित नोएडा, लखनऊ, वाराणसीसह देशभरातील विविध ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित मालमत्तांवर करण्यात आली आहे. वाराणसी येथील मालदहिया तसेच आझमगड या दोन ठिकाणांवरील छाप्यांमध्ये शंभर कोटींहून अधिक रकमेची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. तीन दिवसांच्या कारवाईत मोठे घबाड हाती लागल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली. प्राप्तिकर विभागाला बाबतपूर विमानतळाजवळ कोट्यवधी रुपये मूल्य असलेला भूखंड, अनेक बोगस कंपन्या, नातेवाईकांच्या नावाने फ्लॅट्स तसेच भूखंडांची कागदपत्रे हाती लागली आहेत. बांधकाम उद्योजकांसोबत झालेल्या व्यवहाराचे बँक स्टेटमेंट्स तसेच भूखंडांच्या खरेदीविक्रीद्वारे जवळपास शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक बेनामी संपत्ती देखील हाती लागली आहे. अबू आझमींशी संबंधित ठिकाणांवर गेल्या पाच वर्षांत ही तिसरी टाच आहे. करचुकवेगिरीच्या संशयावरून लखनऊच्या टीमने अतिरिक्त आयकर संचालक डीपी सिंह यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली.
रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुक
मालदहिया येथिल विनायक प्लाझा आणि आझमगड येथील काही निकटच्या लोकांची नावे या छाप्यात पुढे आली आहेत. अबू आझमी यांच्याशी संबंधित या लोकांची रिअल इस्टेट क्षेत्रात तगडी गुंतवणुक आहे. आझमगड येथील काही लोकांच्या नावावर विनायक प्लाझातील दुकाने, शिवपूरच्या वरुणा गार्डन्समधील फ्लॅट्स आदी गोष्टी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Abu Azmi busted… various places raided… so much benami wealth found…