इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – दिल्लीत बसून संपूर्ण देशावर सत्ता करणाऱ्या भाजपला दिल्लीच जिंकता आलेली नाही. आम आदमी पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्लीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस सरकार असतानापासून अर्थात २०१३ पासून पुढे भाजपचे सरकार आल्यानंतर आणि २०२० च्या निवडणुकीतही दिल्लीकरांनी ‘आप’लाच पसंती दिली. मात्र आता मनी लाँडरिंग प्रकरणात अख्खा पक्षच गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने ‘आप’चे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ‘आप’चे मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये अटक झाली. त्यापूर्वी ‘आप’ पक्षाचे माध्यम विभागाचे प्रभारी विजय नायर यांना सप्टेंबर २०२२ मध्ये अटक झाली होती. तर आता राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना याच महिन्यात अटक झाली. पण पक्षावर कारवाई करण्याची आपली तयारी असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात सांगितल्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. कारण आजपर्यंत मनी लाँडरिंगसारख्या प्रकरणात अख्ख्या पक्षाला आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रसंग कधीच आला नाही. यातील कायदेशीर बाबी देखील तपासून घेतल्या आहेत आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहितीही अतिरिक्त महाधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली.
दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्य घोटाळ्याप्रकरणात या कारवाईची शक्यता सांगण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७० नुसार एखाद्या कंपनीवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. या कलमानुसार, व्यक्तींच्या संघटना’ (association of individuals) यामध्ये राजकीय पक्षांचा अंतर्भाव केला जाऊ शकतो. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ (किंवा जनप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१) च्या कलम २९अ नुसार राजकीय पक्ष म्हणजे, ‘भारतातील नागरिकांची कोणतीही संघटना किंवा कोणताही संघ, जो स्वतःला राजकीय पक्ष म्हणून संबोधतो.’
सर्वोच्च न्यायालयात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना अतिरिक्त महाधिवक्त्यांनी ‘आप’वरील कारवाईची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले. त्यासाठी कायद्यातील सर्व तरतुदी आणि स्पष्टीकरणे त्यांनी न्यायालयापुढे मांडली. ‘व्हिकारियस उत्तरदायित्व’ या संज्ञेनुसार पीएमएलए कायद्याअंतर्गत ‘आप’वर गुन्हा दाखल होऊ शकतो. या संज्ञेनुसार स्वतः कृती न करता दुसऱ्याच्या कृतीचा लाभ मिळवून देणे असा होतो.
Aam Aadmi Party’s existence in danger? Will the whole party be wrapped up?