इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – सोशल मीडियामुळे प्रेमवीरांना संपर्क करणे सोपे झाले असले तरी प्रत्यक्ष भेटण्याची ओढ मात्र कमी झालेली नाही. असे प्रत्यक्ष भेटणे आता तसे अवघड असले तरी प्रेमवीरांसाठी ते अशक्य नाही. ते काहीही करुन प्रेयसी पर्यंत पोहचण्याचा जुगाड करतात व भेट घेतात. पण, अशी भेट कधीतरी अंगलट येऊ शकते हे सुध्दा तितकेच खरं आहे. पुण्यात अशीच प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालणे प्रियकरला महागात पडले व त्याला चोप बसला.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विजय अमृत वाघारी (२३) असे या प्रियकराचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विजयचे दहावीत शिकणा-या मुलींवर प्रेम आहे. या प्रेमाची कुणकुण कुटुंबियांना लागल्यामुळे त्यांनी भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे विजयने शक्कल लढवत बुरखा घालुन प्रेयसीला भेटण्याचा निर्णय घेतला. पण, तो त्याला चांगलाच महागात पडला.खरं तर असे प्रसंग प्रेमवीरांना नेहमीच येतात. पण, त्यातून ते धडा काही घेत नाही.
विजयच्या बुरखा घालण्याचे बिंग फुटले व त्याची चांगलीच फजिती झाली. प्रेयसीला भेटण्याअगोदच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. लहान मुले पळवणारी टोळीतील सदस्य समजून त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या पाठलाग केल्याच्या आरोपावरुन गुन्हाही दाखल झाला.