इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलनामुळे वातावरण तापले आहे. त्याचप्रमाणे आरक्षणावरुन होत असलेल्या विरोधी सुरामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यातच सरकारात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आता या सर्व प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या प्रश्नात लक्ष घालण्याची शक्यता आहे. शाह लवकरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यात या सर्व गंभीर विषयावर ते चर्चा करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी रात्री शाह यांची भेट घेतली. वरवर ही भेट केवळ दिवाळी शुभेच्छासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीत तब्बल दीड तासांहून अधिक चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अमित शाह यांनी फटकारल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला आहे. तर दुसरीकडे या भेटीत मुख्यमंत्रीपदसह विविध विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
आरक्षणाचा मुद्दा सरकार योग्य पध्दतीने हाताळत नसल्याची चर्चा दिल्लीत गेली आहे. त्यामुळे अमित शाह यांनी या विषयावर लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर महायुतीची बैठक होणार असून त्यात या सर्व विषयांवर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.