इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
पाकिस्तान संघाला अद्याप विश्वचषक सेमी फायनल प्रवेशाची संधी आहे हे सर्वश्रूत झाले आहे. परंतु, ही संधी किती कठीण आहे हे जाणून घेतल्यानंतर कुणीही पाकिस्तान संघावर पैंज लावायला तयार होत नाही. क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला २८७ धावांनी पराभूत करणे कठीण आहे ही जाणिव क्रिकेटची जाण असलेल्या संगळ्यानाच असल्यामुळे पाकिस्तानचे या विश्वचषकातील आव्हान जवळजवळ संपुष्टात आल्याचे मानले जात असतांनाच पाकिस्तानचा माजी कर्णधार/जलदगती गोलंदाज आणि समालोचक वासिम अक्रम याने आपल्याच संघाची चेष्टा केली आहे.
या विश्वचषकात श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा क्रिकेटच्या इतिहासात टाईम आउट होणारा पहिला खेळाडू ठरला. हाच धागा पकडून वासिम अक्रम म्हणाला की “इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून जी काही धावसंख्या रचता येईल ती रचून ठेवावी आणि त्यानंतर २० मिनिटांसाठी इंग्लंडच्या ड्रेसिंगरूमला त्यांनी बाहेरून कुलूप लावून घ्यावे. म्हणजे नियमानुसार इंग्लंडचे सगळे फलंदाज टाईम आउट ठरवले जातील…..”
१९९६ च्या विश्वचषक विजयानंतर मागच्या सतत तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये आपला संघ किमान सेमी फायनलमध्ये देखील पोहोचलेला नाही याचे शल्य वासिम अक्रमने अशा मजेशीर पध्दतीने पाकिस्तानची टर उडवली आहे. आता अक्रमचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले आहे. स्विंगचा सुलतान म्हणून प्रसिध्द असलेल्या वासिम अक्रमने या स्पर्धेतल्या साखळी सामन्यात ज्यावेळी अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर शंका उपस्थित करून मटनाचा संदर्भ दिला होता. अक्रमचे ते वक्तव्य देखील चांगलेच गाजले होते.
याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजनसिंग याने देखील पाकिस्तान संघाची अशीच मजेशीर ‘फिरकी’ घेतली होती. न्युझीलंड वि.श्रीलंका सामन्यानंतर समालोचन करतांना हरभजन म्हणाला होता, पाकिस्तानने २८७ धावांनी जिकंण्याची गोष्ट तर सोडाच, परंतु त्यांच्या फलंदाजांनी त्यांच्या डावात आधी किमान २८७ धावा केल्या तरी खूप होईल अशा शब्दात हरभजनने या विषयावर खोचक टिप्पणी केली होती.