इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क-
आयसीसी विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना खेळून २४ तासांचा कालावधी देखील उलटत नाही तोवर आता आयसीसीने देखील श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आधिकृत सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेऊन क्रिकेट जगताला एक मोठा धक्का दिला आहे.
श्रीलंका आयसीसीची सभासद असून या सभासदत्वाच्या नियमावलीनुसार श्रीलंकन क्रिकेट बोर्ड हे स्वतंत्ररीत्या कारभार बघण्यात अपयशी ठरत असल्यामुळे आणि तिथल्या सरकारचा बोर्डाच्या कारभारातील हस्तक्षेप वाढल्यामुळे श्रीलंकेचे सदस्यत्व निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निलंबनाच्या बाबतीत आयसीसी आपली पुढील भूमिका येत्या २१ नोव्हेंबरच्या बैठकीनंतर जाहीर करील. महत्त्वाची बाब अशी आहे की, १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये श्रीलंकेत करण्यात येणार आहे.
विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकन संघाची ज्या पद्धतीने अधोगती झाली त्यावर तिथल्या क्रीडामंत्र्यांचे तिखट वक्तव्य आणि त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तत्काळ बरखास्त करण्याचा घेतला गेलेला निर्णय, यामुळेच आयसीसीने ही पावले उचलली असावीत असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.