इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज दिल्लीत भेट घेतली. या भेटीत दीड तासाहून अधिक चर्चा झाली. अजित पवार यांच्याबरोबर खा. प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थितीत होते. या भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांच्याशी दिल्लीत भेट झाली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सवाचा आनंद शेअर करण्याच्या संधीबद्दल कृतज्ञ असे म्हटले. मात्र या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात ओबीसी समाजाचा विरोधही समोर आला आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती यावर आता तर्कवितर्क सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कुणाची हा फैसला अद्याप बाकी आहे. त्यामुळे ही भेट त्यासाठी होती का असे बोलले जात आहे.
अगोदर शरद पवार यांची भेट नंतर दिल्लीला रवाना
दिल्लीला जाण्याअगोदर शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले. आमदार अपात्रता प्रकरणी पुढच्या महिनाअखेर निर्णयाची शक्यता, अजितदादांची नाराजी आणि पुन्हा दिल्लीला जाणे यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. दुपारीच दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांची भेट शरद पवारांबरोबर झाली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीते नेमकं चाललं काय आहे याबाबत वेगवेगळे तर्क काढण्यात येत आहे.