इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा वाद अजून न्यायप्रविष्ट असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले. आमदार अपात्रता प्रकरणी पुढच्या महिनाअखेर निर्णयाची शक्यता, अजितदादांची नाराजी आणि पुन्हा दिल्लीला जाणे यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
दुपारीच दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांची भेट शरद पवारांबरोबर झाली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीते नेमकं चाललं काय आहे याबाबत वेगवेगळे तर्क काढण्यात येत आहे. बाणेरमध्ये प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. बाणेरमधील घरी शरद पवार गेले असताना, त्याठिकाणी अजित पवारदेखील उपस्थित होते. खरं तर हे सर्व पवार कुटुंबिय दिवाळी निमित्त एकत्र आले. पण, त्याची राजकीय चर्चा मात्र जोरात सुरु झाली. या भेटीनंतर अजितदादा दिल्लीत गेल्यामुळे ही चर्चा अजून जोरात सुरु झाली.
अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. त्याअगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीला हजेरी लावली. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक असल्याचे बोलले जात असले तरी यामागे नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही.