इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ओमानच्या आखातात ताब्यात घेण्यात आलेल्या ॲडव्हांटेज स्वीट’ (मार्शल आयलंड फ्लॅग) या जहाजावरील सर्व २३ भारतीय खलाशांना इराणमधून सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालय, इराणमधील भारतीय दूतावास,बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि इराण सरकारच्या सहकार्याने हे साध्य झाले आहे.
आपल्या भारतीय खलाशांचे जीवन आणि स्वातंत्र्य जेव्हा धोक्यात असते, त्यावेळी,’बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय’ त्यांचे कल्याण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित असते,असे जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित परतल्यानंतर केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. भविष्यात देखील, जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा अशीच मदत करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बचाव मोहिमेने सरकारी यंत्रणांच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचेही एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.