इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यायला आता सर्वंच ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाचा योद्घा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा तरुणांचे नुकसान झाल्याची टीका केल्याने आता त्यांच्याविरोधात नाराजी झाली आहे.
ओबीसीमध्ये समावेश झाल्याने मराठा समाजाला फार लाभ होणार नाही. मराठा समाजाला ओबीसीत केवळ तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता त्यांच्या सुरात वडेट्टीवार यांनी सूर मिसळला आहे. मराठ्यांना जर ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणातून दहा टक्के आरक्षण मिळत असेल, तर तो खूप मोठा फायदा होत आहे; परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करुन घेण्याची नशा असावी. जरांगे मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत, असा आरोप त्यांनी केला.
जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचे भविष्यात फार मोठे नुकसान होणार आहे, असा दावा त्यांनी केला. मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावा, जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर त्यांनी सर्व काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला. ओबीसीमध्ये आजघडीला ३७२ जाती अस्तित्वात आहेत. त्यात परत ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण घेऊन फार काही मिळणार नाही. उलट बाहेर राहून त्यांना जास्त फायदा होईल. खुल्या वर्गात फार जाती राहणार नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांचा नोकरी आणि सोयी सवलती संदर्भात फार मोठे नुकसान होणार आहे, असे ते म्हणाले.