इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत कांदा प्रश्नावर काहीच तोडगा न निघाल्यामुळे नाराज असलेल्या कांदा व्यापा-यांची बैठक आज पिंपळगाव बसवंत येथे झाली. या बैठकीत सरकारने आमची एकही मागणी मान्य केलेली नाही सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद कायम राहणार असल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे प्रवक्ते प्रवीण कदम यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, कांदा व्यापारी असोसिएशनचा खासगी कांदा मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी लवकरच खासगी कांदा मार्केट सुरू करणार आहे. नाफेडच्या माध्यमातून कांद्याचे दर पाडून शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे. मात्र त्याच खापर मात्र व्यापाऱ्यांच्या माथी फोडलं जात आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या तर लिलाव सुरू करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, सरकार व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. विंचूरमध्ये काही व्यापाऱ्यांवर दबाव टाकून कांदा लिलाव सुरू केले गेले असेही ते म्हणाले.
व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी यी बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याचे सुध्दा बोलले जात आहे.