नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये केलेल्या दोन कारवाईत ८४ हजार ११० रुपये किंमतीचे ३९७ किलो पनीर जप्त केले आहे. पहिली कारवाई सिडको येथील त्रिमुर्ती चौकातील विराट एंटरप्रायजेस या दुकानावर केली. येथे पनीरमध्ये खादयतेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीर या अन्नपदार्थाचा अन्ननमुना घेऊन उर्वरित सुमारे ७४ किलो, किंमत १६ हजार २८० किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून तो नष्ट करण्यात आला. तर सिडकोतच दुसरी कारवाई अंबड येथील मे साई एंटरप्रायजेस या दुकानावर केली. येथे पनीरमध्ये खादयतेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीर या अन्नपदार्थाचा अन्ननमुना घेऊन उर्वरित सुमारे ३२३ किलो, किंमत ६७ हजार ८३० रुपये किंमतीचा साठा जप्त करुन नष्ट करण्यात आला.
या कारवाईबाबात एफडीएने सांगितले की, व्यापक जनहिताच्या दृष्टिने हा साठा नष्ट करण्यात आलेला आहे. सदरचे दोन्ही पनीर हे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व वि.पां. धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), वाहनचालक नि.खं. साबळे यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईबरोबरच अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले की, सणासुदीच्या काळात नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे. त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेली मिठाईची विक्री करावी अथवा दुधापासूनच्या न बनविलेल्या मिठाई विक्रीसाठी ठेवल्यास त्याबाबत स्पष्ट फलक दुकानात लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांस आवाहन करण्यात येते की, त्यांनी
भेसळयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थ बनविणेकामी करु नये. नागरीकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा.