इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने माजी मुख्य पार्सल पर्यवेक्षक, मुख्य यार्ड मास्टर, डेप्युटी स्टेशन मॅनेजर (यार्ड) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कुर्ला, मध्य रेल्वे, मुंबईच्या पर्सल विभाग आणि यार्ड विभागातले इतर तत्कालीन दहा जण आणि काही खाजगी व्यक्तींवर पार्सल हाताळण्यात अनियमितता आणि टर्मिनसवर व्हीपीयू वॅगन्स सुविधेसंदर्भातल्या आरोपाखाली दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यासाठी यापूर्वी संयुक्त आकस्मिक तपासणी करण्यात आली होती.
पहिल्या प्रकरणात, असा आरोप करण्यात आला आहे की पार्सल विभागाचे अधिकारी खाजगी लोडर्स/लीज धारकांकडून त्यांना मदत करण्यासाठी नियमितपणे रोख स्वरुपात किंवा यूपीआय द्वारे लाच घेत होते. दुसऱ्या प्रकरणात, यार्ड विभागात नियुक्त केलेले मध्य रेल्वेचे सार्वजनिक सेवक खाजगी एजंट्सकडून रोख स्वरूपात आणि यार्डमध्ये पोस्ट केलेल्या पॉइंट-मॅनच्या खात्यात यूपीआय पेमेंटद्वारे लाच घेत असल्याचा आरोप करण्यात आला. टर्मिनसवर व्हीपीयू वॅगन सुविधेसाठी ही लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींनी एजंटांकडून लाच घेतल्याचा आणि लाचेचा काही भाग त्यांच्या वरिष्ठांना दिल्याचाही आरोप आहे.
आरोपींच्या निवासस्थानासह मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक इत्यादी ठिकाणी आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, मोबाईल फोन इत्यादी जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.