इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
क्रिकेट हा अनिश्चीततेचा खेळ आहे. यात, केव्हा आणि काय होईल याबाबत काहीही सांगता येत नाही. विश्वचषकात २०२३ मध्ये याचा चांगलाच अनुभव आला आहे. विश्वविजेता इंग्लड साखळीतच गारद झाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नव्हती परंतु त्यांनी शेवट चांगला केला तर न्युझीलंड संघाची सुरूवात चांगली झाली होती आणि शेवटी ते आता कसेबसे अडखळत सेमी फायनल गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. तिकडे नवख्या अफगाणिस्तानचे नाव अजूनही सेमी फायनलच्या शर्यतीत जिवंत आहे. नेदरलॅण्डने बलाढ्य संघांना जोरदार धक्के दिले आणि त्या एका सामन्यात जिथे प्रतिस्पर्धी अफगाण संघ जिंकण्याचे ९२ टक्के चान्सेस होते तिथे ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ आले आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. या घटनाक्रमांचा विचार केल्या या विश्वचषकात अजूनही काहीही होवू शकते असा विश्वास बाळगायला हरकत नाही.
आता हेच बघा ना, न्युझीलंडचा संघ सेमी फायनलचा चवथा संघ म्हणून जवळजवळ निश्चीत झालेला असला तरी तशी अधिकृत घोषणा होण्याआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाकडे एक संधी उपलब्ध आहे. या विश्वचषकात नेट रनरेट हा कळीचा मुद्दा बनला असून जर पाकिस्तानने इंग्लंडला ५० षटकांच्या सामन्यात तब्बल २८७ धावांनी पराभूत केले तरच नेट रनरेटच्या आधारावर पाकिस्तानचा संघ सेमी फायनल गाठू शकतो असा काहीसा ‘अजब गजब’ फॉर्म्युला पाकिस्तानला सोडवावा लागणार आहे. थोडक्यात काय तर, टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करतांना जर ४०० धावा केल्याच तर त्यांना अपेक्षीत नेट रनरेट गाठण्यासाठी इंग्लंड संघाला ५० षटकात ११२ धावसंख्येच्या आत गुडाळावे लागेल. या नाण्याला दुसरी बाजू देखील आहे. पाकिस्तान जर टॉस हरला आणि इंग्लडने प्रथम फलंदाजी स्विकारली तर काय?. पहिल्या टास्कपेक्षा हा टास्क आणखी कठीण आहे. म्हणजे कसा, ते बघा. जर पाकिस्तानने इंग्लंडला अवघ्या १०० या धावसंख्येवर रोखलेच तर पाकिस्तानला अवघ्या ५ षटकात हे टार्गेट गाठून विजय साध्य करावा लागेल. (ही आकडेवारी केवळ कपोलकल्पीत आणि उदाहरणादाखल दिलेली आहे याची नोंद घ्यावी). म्हणजे टॉस हरणे देखील पाकला परवडणारे नाही.
हा सगळा फॉर्म्युला किती अवघड आहे याचा विचार न केलेलाच बरा. इंग्लडचा फॉर्म जरी खराब असला तरी वन-डे इतिहासात हा संघ आत्तापर्यंत झालेल्या त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये सन २००१ साली ऑस्ट्रेलियाविरूध्द ८६ या निचांकी धावसंख्येवर बाद झाला होता. आता या पार्श्वभुमीवर जर इंग्लंड संघाला २८७ धावांनी पराभूत करायचे असेल, तर पाकिस्तानला जे काही करावे लागेल ते क्रिकेटच्या भाषेत अशक्यप्राय मानले जाते. शिवाय, इंग्लडने या विश्वचषकात खराब कामगिरी केलेली असली तरी इतका मानहानीकारक पराभव इंग्लंडचे खेळाडू पचवून घेतील का? याचे उत्तर नाही असेच असणार आहे.
इकडे पाकिस्तानला सेमी फायनलच्या प्रवेशाची चिंता असतांना तिकडे इंग्लंडला वेगळीच चिंता सतावते आहे. आयसीसी ची चॅम्पीअन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ मध्ये होणार आहे. विश्वचषक २०२३ मध्ये जे संघ पहिल्या आठ स्थानांवर आपली जागा निश्चीत करतील त्याच संघाना चॅम्पीअन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. सध्या गुणतालिकेत इंग्लंड सातव्या स्थानावर विराजमान आहे. पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मोठ्या फरकाने विजय मिळवला तर इंग्लंडचे हे स्थान नेट रनरेटच्या आधाराने डळमळीत होवू शकते आणि चॅम्पीअन्स ट्रॉफीमधील त्यांचा सहभाग देखील धोक्यात येवू शकतो हे माहिती असल्याने इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने पाकिस्तानविरूध्द कंबर कसली आहे.
या विश्लेषणाचा सारांश हाच निघतो की पाकिस्तान संघाने आता आशा सोडून दिलेलीच बरी आणि त्यांनी दिवास्वप्न न बघितलेलीच बरी. कारण…. “दिल है छोटासा, छोटीसी आशा…चॉंद तारों को छूने की आशा” आसमानों मे उडने की आशा’ हे गाणं ऐकतांना कानाला बरं वाटेल हो, पण मैदानावर क्रिकेट खेळतांना त्याचा काय उपयोग ?