इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आग्रह असताना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी सावध भूमिका घेतली असली, तरी २४ डिसेंबरनंतर आपण यावर बोलू, असा इशारा दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यामुळे सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगेंमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात येणार अशी अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली. भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच काय कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने संभ्रम मनात बाळगू नये. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर जरांगे पाटील यांनी सावध भूमिका घेतली असली, तरी आता ते राज्यभर दोरा करणार आहेत. दोन जानेवारीला त्यांनी दिलेली डेडलाईन संपणार असली, तरी २४ डिसेंबरलाच ते भूमिका जाहीर करणार आहेत.