इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन गटाने पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. दोन्ही गटाचे म्हणणे पक्ष आपलाच असल्याचे आहे; आज या वादावर निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही गटांनी युक्तीवाद केला. त्यानंतर पुढील सुनावणीसाठी आता २० नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. ही सुनावणी सलग होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची, याचा वाद सुरू झाला आहे. दोन्ही गट निवडणूक आयोगात पोचले आहेत. शरद पवार गटाने मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात एक ट्रकभर पुरावे दिले. अजित पवार गटानेही लाखो प्रतिज्ञापत्रे दिली आहेत. आज या प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. निवडणूक आयोग आज सुनावणी घेऊन निकाल देणार, की पुन्हा नवी तारीख देणार? याकडे दोन्ही गटाचे लक्ष लागले होते. पण, पुढील तारीख दिली आहे.
या सुनावणीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे उपस्थितीत होते. तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे सह नेते उपस्थितीत होते. या सुनावणीत कागदपत्रांतील काही तांत्रिक चुका व अपूर्ण असल्याचा मुद्दा चर्चेचा ठरला.
शिवसेनेतील चिन्हाच्या लढाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरू आहे. पक्षात फूट आहे की नाही, याचा फैसला निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे. शरद पवार गटाचा दावा आहे, की पक्षात फूट नाही, पक्ष आमचाच आहे. पक्षाची घटना, आमदार खासदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या या गोष्टी तपासून निवडणूक आयोग निर्णय घेईल. यापूर्वी अंतिम निकाल लागण्याआधी निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता निर्णय घेते. शिवसेनेच्या बाबतीतही तसा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली.