इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे वंचितांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी ‘पालावरची दिवाळी’साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक आ.गोपीचंद पडळकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. भारतीय सण आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून पक्षातर्फे दिपोत्सवा दरम्यान ‘एक दिवा वंचितांसाठी’ प्रत्येक पालावर लावण्यात येणार आहे असेही बावनकुळे यांनी नमूद केले .
बावनकुळे म्हणाले की ‘पालावरची दिवाळी’ हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून भटक्या विमुक्तांशी आमचे भावनिक नाते असल्याने त्यांच्यासोबत भाजपा नेते, कार्यकर्ते यंदा दिवाळी साजरी करणार आहेत. राज्यात जवळपास ३८ भटक्या जमाती पालावर राहतात. भाजपातर्फे प्रत्येक पालावर जाऊन दीप प्रज्वलन करून फराळ, नवीन कपडे ,शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. पालावरील परिसर स्वच्छ करून सुगंधी तेल व उटण्यासहित अभ्यंगस्नानाची व्यवस्था देखील केली जाणार आहे. दीपावलीनिमित्त सर्व वंचित घटकांना हिंदू म्हणून सामावून घेत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
मोदी सरकार ओबीसींना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने त्यांच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. कारागीर व मजूरांसाठी सरकार विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी ३ लाखांपर्यंत कर्जे उपलब्ध करून देत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.