नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिखरेवाडी बस स्टॅाप परिसरातील एका फटाके विक्रेत्याला मोठमोठे होर्डींग लावून विनापरवानगी फटाके विक्री करणे चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी या विक्रेत्याच्या ताब्यातून सुमारे २४ लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश नंदकिशोर खराटे (४० रा.जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक गोळे यांनी फिर्याद दिली असून संशयिताने महानगरपालिका,पोलिस आणि अग्निशमन दलाची लेखी परवानगी न घेता नाशिक पुणे मार्गावरील शिखरेवाडी बस स्टॉप परिसरातील अंबा सोसायटी परिसरात फटाके विक्रीचा स्टॉल लावला होता.
ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने लोकवस्ती मध्ये मास्टर फटाका डेपो नावाचे मोठमोठे फटाका विक्रीचे होल्डींग लावले. मंगळवारी (दि.७)पोलिसांनी छापा टाकला असता संशयिताच्या स्टॉलमध्ये सुमारे २४ लाख ६२ हजार ६९० रूपये किमतीचे फटाके मिळून आले. इतरांचे जीव व सुरक्षीतता धोक्यात आणणारा ज्वालाग्रही आणि स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून अधिक तपास उप निरीक्षक बटूळे करीत आहेत.