इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माजी आमदार पंकज भुजबळ यांनी भेट घेतली. यावेळी नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी दिले. यावेळी नांदगावची परिस्थिती पाहता तातडीने याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात येईल असे आश्वासन ना. अनिल पाटील यांनी दिल्याचेही पंकज भुजबळ यांनी सांगितले.
या भेटीबाबत भुजबळ म्हणाले की, नांदगाव तालुक्यात अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला आहे. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा आस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी मी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे संपूर्ण नांदगावच्या जनतेच्या वतीने केली.
त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील याबाबत पत्रव्यवहार केला आहे.