इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांबाबत तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेबाबत चर्चा करण्यासाठी सरकारमधील चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. जरांगे यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तिथे जाऊन हे शिष्टमंडळ जरांगे यांच्यांशी चर्चा करणार आहे.
जरांगे पाटील यांच्यांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असल्याचे मुहूर्त यापूर्वी तीनदा निघाले; परंतु ते हुकले. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या भेटीत शिष्टमंडळाकडून जरांगे यांना टाईम बॉन्ड दिले जाण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा आहे.
सुरुवातीला सहा नोव्हेंबर रोजी हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा मुहूर्त टळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात तारखेला सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर होते. पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळाचा दौरा रद्द करण्यात आला. आठ तारखेला हे शिष्टमंडळ शंभर टक्के येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. परंतु तो मुहूर्त टळला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आमचे काम, आंदोलनाची पुढची दिशा याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. सरकार ही जोरात काम करत असून ते त्यांच्या शब्दावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.