इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लोकपालांनी ‘सीबीआय’चौकशीचे आदेश दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोवर मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. मोईत्रा यांची नीतिमत्ता समितीकडून चौकशी करण्यात आली. आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करणार आहे. दुबे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की लोकपालांनी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुबे यांनी आधी मोईत्रा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना त्यांनी ७५ लाख रुपये दिले होते. मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील हिरानंदानी यांनीच केली होती, असे आरोप दुबे यांनी केले आहेत.