इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकार सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे. सरकार प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘क्लाउड सीडिंग’ म्हणजेच कृत्रिम पावसाचा विचार करत आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. एवढेच नाही तर हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयातही सादर केला जाणार आहे.
राजधानीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्याच्या प्रयत्नात दिल्ली सरकार या महिन्यात ‘क्लाउड सीडिंग’द्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले, की जेव्हा वातावरणात ढगाळपणा किंवा आर्द्रता असेल तेव्हाच क्लाउड सीडिंगचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दिल्लीत प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्याच्या योजनेवर हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की कृत्रिम पावसावर जागतिक स्तरावर संशोधन केले जात आहे. भारतात तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकात काही प्रयत्न झाले आहेत. जागतिक स्तरावर कृत्रिम पावसावर संशोधन केले जात आहे, ज्यासाठी ढग किंवा आर्द्रता या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे.
ढगांचे संक्षेपण पावसासाठी योग्य बनवण्यासाठी ढगांमध्ये काही केंद्रके शिंपडली जातात. यामुळे पाऊस पडतो. कृत्रिम पावसावर भारतातही संशोधन सुरू आहे; पण आजपर्यंत त्यात फारशी प्रगती झालेली नाही.