नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातही पाण्याच्या अभावामुळे पुरेश्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहिर करण्यात येवून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.
जिल्हृयात कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दुष्काळ जाहिर करणेबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली आहे.
तसेच याबाबत गांभीर्याने विचार करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे.