इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
पाटणा : बिहार विधानसभेत महिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माफी मागितली आहे. ‘मी स्त्री शिक्षणाबद्दल बोललो होतो; पण माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. माझी कुठली गोष्ट चुकीची वाटली असले, तर मी माफी मागतो. मी माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत नितीश कुमार यांनी सपशेल माफी मागितली. भाजप आणि खा. असदुद्दीने ओवीस यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. विधानसभेत हंगामा झाला. महिला आमदारांना रडू कोसळले. त्यानंतर नितीशकुमार यांना उपरती झाली.
नितीश कुमार लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलत होते. महिलेने ठरवले, तर लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते, असे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. महिला त्यांच्या पतीला संबंध बनवण्यापासून रोखू शकतात, या त्यांच्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नितीश कुमार सेक्स एज्युकेशनबद्दल बोलत होते; पण त्यांनी या विषयावर बोलताना चुकीच्या शब्दांची निवड केली. नितीश कुमार यांच्या या विधानामुळे महिला आमदारांच्या भावना दुखावल्या. विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला. “मला स्वत:चीच लाज वाटतेय. मी स्वत:चा निषेध करतो. माझे वक्तव्य दु:खद आहे. मी महिलांच्या बाजूने आहे” असे नितीश कुमार म्हणाले.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा बचाव केला होता. “मुख्यमंत्री जे काही म्हणाले, त्याकडे योग्य दृष्टीने पाहिले पाहिजे. यात काही आपत्तीजनक नाही. शाळेत लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून या गोष्टी मुलांना सांगितल्या जातात. कोणी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत असेल, तर हे योग्य नाही. सेक्स एज्युकेशनशी संबंधित त्यांचे हे वक्तव्य होते” असे तेजस्वी म्हणाले. आमदार निवेदिता सिंह यांनी नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. नितीश यांच्या या विधानानंतर त्या सभागृहाबाहेर गेल्या. त्यांना रडू कोसळले.