इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा सापळा बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता यशस्वी करण्यात आला. सुभेदार भीमा उखडू भील, महिला कॉन्स्टेबल पूजा सोपान सोनवणे अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. दरम्यान, 2016 मध्ये जेल अधिकारी डाबेराव यांना अटक करण्यात आल्यानंतर सुमारे सात वर्षांनी जेलमध्ये लाचेची कारवाई झाली हेदेखील विशेष !
असे आहे लाच प्रकरण
पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा 307 च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवार, 7 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. तिघाही संशयितांनी दोन हजारांची लाच भेट घडवून आणण्यासाठी मागितल्याने त्यांना बुधवारी दुपारी दिड वाजता लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. महिला पोलिस हेमलता पाटील यांनी लाच स्वीकारली तर लाच स्वीकारण्यासह अन्य दोघांनी सहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.