इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पीकविमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे सतराशे कोटी रुपये पीकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील ३५ लाख आठ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वीच पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
खरीप हंगामात कामी पावसामुळे तसेच पावसात पडलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल एक कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना काढून २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्यानंतर विमा कंपन्यानी एकूण सतराशे कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर शिंदे यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत सातत्याने आग्रही होते. उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.