इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेस विरोध केल्याने आता पंढरपूरला कार्तिक एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्याविना पार पडणार आहे. देवस्थान समितीने उपमुख्यमंत्र्यांना पूजेला न बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस की अजित पवार यापैकी कोण विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार यावर चर्चा सुरु होती. दोन उपमुख्यमंत्री असल्याने मंदिर समितीसमोरही पेच निर्माण झाला होता. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे मंदिर समितीचा तिढा आपोआप सुटला आहे. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या भावना शासनाला कळवण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.
कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. पंढरपुरातही हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. या पूजेचा मान कोणाला मिळणार या विषयी अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.