इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
मोठ्या संघांना पराभवाचे धक्के देण्याचे काम अफगाणिस्तान संघाने या विश्वचषकात सुरूच ठेवले होते. काही दिवसांपुर्वी गत विश्वविजेत्या इंग्लंडला, त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचीही ‘वेळ’ आलेली असतांनाच पायात क्ररॅम्प येवून देखील ग्लेन मॅक्सवेलने (१२७ चेंडूत नाबाद २०१ धावा) एकाकी झुंजार खेळी करुन आपल्या संघाचा होत आलेला लाजिरवाणा पराभव वाचवला.
मुंबईत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर इब्राहिम जादरान याने १४३ चेंडूत नाबाद १२९ धावा करून अफगाणिस्तानला ५० षटकात ५ बाद २९१ या अतिशय चांगल्या धावसंख्येवर नेऊन ठेवले. रहमत शाह, हशमतुल्ला शहीदी आणि शेवटी अवघ्या १८ चेंडूत ३५ धावांची ‘आतषबाजी’ करणाऱ्या रशीद खानने चाहत्यांची मने जिंकली होती.
खरेतर ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म बघता ही धावसंख्या फारशी अवघड वाटत नव्हती. परंतु नवीन उल हक, अजमतुल्ला उमरजाई आणि रशीद खान या त्रिकुटाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नामोहरम करून टाकले होते.
डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड हे ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लाबुशेन, मिशेल मार्श यापैकी कुणालाच खेळपट्टीवर तग धरून उभे राहून जादू करता आली नव्हती. एकवेळ तर अशी आली होती की अवघी १८ षटके टाकली गेलेली असतानाच ऑस्ट्रेलियाचे ७ गडी ९१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतलेलेले होते. परंतु त्यानंतर जखमी झालेल्या मॅक्सवेलने सगळ्यांच्या लक्षात राहील अशी जबरदस्त खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात संस्मरणीय खेळी केली.
विश्वचषकात आता साखळीतले फक्त ६ सामने शिल्लक असून त्यापैकी इंग्लंड विरुद्ध नेदरलँड हा सामना उद्या पुण्यात खेळवला जाईल. २०२३ च्या विश्वचषकातील या ४० व्या सामन्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (९ नोव्हेंबर ) अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका (१० नोव्हेंबर )ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (११ नोव्हेंबर ) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (११ नोव्हेंबर ) आणि भारत विरुद्ध नेदरलँड (१२ नोव्हेंबर ) इतकेच सामने आता शिल्लक राहिले.