येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पालखेड कालवा निर्मिती येवला तालुका कायम दुष्काळी म्हणून झाली असून यंदा तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीप पूर्णपणे हातचा गेल्याने व पालखेड धरण समूहातील सर्वच धरणे १०० टक्के भरलेली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे भल्यासाठी रब्बी पिकांसाठी १५ नोहेंबर पासून दोन आवर्तने सोडण्यात यावी. या मागणी साठी येवला प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्रीसह नाशिकचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता पालखेड डावा कालवा विभाग यांना पत्राद्वारे निवेदन दिले
या निवेदनात म्हटले आहे की, मध्यंतरी पडलेल्या अल्प पावसावर परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली असून आज परिसरात विहिरी कोरड्या असल्याने पाणी लवकर सोडल्यास कांदा पीक हातात येऊन शेतक-याच्या हाती दोन पैसे मिळतील. पूर्वानुभव बघता नुसता तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नसून दोन आवर्तने दिल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा भेटेल.
वास्तविक करंजवण, पालखेड धरणातील १ नोव्हेंबर रोजीचा पाणीसाठा ५६५० दशलक्ष घनफुट व वाघाड धरणातील ४० टक्के पकडून तिन्ही धरणातील जलसाठा ६८५० दशलक्ष घनफुट उपलब्ध असल्याने पाहिल्या ३० दिवसाच्या अवर्तनासाठी १८०० दशलक्ष घनफुट व दुसऱ्या २५ दिवसाच्या अवर्तनासाठी १४०० दशलक्ष घनफुट पाण्याची गरज लागणार असून उपलब्ध पाणीसाठ्यात प्रासंगिक आरक्षण वजा जाता हे सहज शक्य असल्याने येवला तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बीचे १५ नोहेंबर ते १५ डिसेंबर पाहिले व १ जानेवारी ते २५ जानेवारी दुसरे आवर्तन देण्यात यावे.
अन्यथा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटने कडून १५ नोहेंबर २०२३ रोजी परिसरातील शेतक-यासमवेत मंत्रालयासमोर सकाळी ११ वाजता आत्मदहन आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे,शिवाजी खापरे,विलास उराडे, अशोक खापरे, दीपक सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.