मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी होत असतांना विरोधकांची एकजुट मजबुत करण्यासाठी विरोधी पक्षांनी सुध्दा मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये आज अतिशय महत्त्वाची बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आले नसले तरी देशभरात सुरु असलेल्या निवडणुका व राज्याच्या राजकारणावरील घडामोडीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसे करावे, कुणाला किती जागा द्यायच्या, याबाबत या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे. पवार यांच्यावर जागावाटपाची जबाबदारी आहे. इंडिया आघाडीच्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी झाली आहे. उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संबंध दृढ राहिले पाहिजेत, असा पवार आणि ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी ठाकरे आणि पवार यांच्यातील महत्त्वाची भेट होत आहे. जागावाटप आणि प्रचार कसा करावा, याबाबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.