इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन पक्ष असा सध्या राज्यचा कारभार सुरू आहे. अशात या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत. अजित पवार सत्तेत आल्यापासून कायमच चर्चेत आहेत. त्यांना कोणते खाते मिळणार येथून त्यांच्याबाबत सुरू झालेली चर्चा अजून संपलेली नाही. दरम्यानच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिकारांवर गदा आणत असल्याची जोरदार चर्चा होती.
राष्ट्रवादीतून अजित पवारांनी वेगळे होत भाजपसह सत्तेत सहभाग घेतला. अशात आता तयार झालेल्या महायुतीवर अजित पवार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांनी गणपती दर्शनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी हजेरी लावली होती. तसेच बाप्पाचे दर्शन घेतले होते. चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक चकमक रंगली होती. त्यानंतर आता अजितदादा महायुतीमध्ये नाखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सागर बंगल्यावर गेले त्यावेळी तेथे देवेंद्र फडणवीसांशी त्यांची बराच वेळ चर्चा सुरू होती. याच दिवशी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचेही दर्शन घेणार होते. मात्र चर्चा बरीच वाढल्याने वर्षावर जाणे आयत्यावेळी रद्द करावे लागले. शुक्रवारी मात्र ओबीच्या समाजाच्या बैठकीत ते मुख्यमंत्रीबरोबर दिसले.
वर्षाकडे पाठ
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी वर्षावर हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं. मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार देखील वर्षावर आले होते. सोशल मीडियावर शाहरुख आणि सलमान खान यांचे वर्षावरील फोटो तुफान व्हायरल होत आहेत. वर्षावर मराठी सिनेविश्वातील देखील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कलाकार आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार न आल्याने त्यांनी वर्षाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे. पण, शुक्रवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर ते दिसल्यामुळे या चर्चेला आता विराम मिळेल की चर्चा अशीच सुरु राहणार ….