नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मोहिम सुरु केली असून दोन कारवाईत दोन लाखाहून अधिक साठा जप्त केला आहे. पहिली कारवाई सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमधी मे. इगल कॉर्पोरेशन येथे धाड टाकून करण्यात आली. याठिकाणी तपासणी केली असता खुले खादयतेल तसेच पुर्नवापर केलेल्या डब्यांमध्ये खादयतेलाची विक्री तसेच भेसळीच्या संशयावरुन रिफाईण्ड सोयाबीन तेल (खुले) ५३ प्लॉस्टिक कॅन किंमत ९३ हजार ३३५ रिफाईण्ड सोयाबीन तेल ४१ पुर्नवापर केलेले डबे एकुण ६१३.४ किलो, किंमत ६२ हजार ५६६ रुपये रिफाईण्ड पामोलिन तेल पुर्नवापर केलेले २८ डबे एकुण ४१८.४ किलो, किंमत ३७ हजार ५५६ एकुण किंमत १ लाख ९३ हजार ५५८ रुपये इतका साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी ही कारवाई केली.
तर दुस-या छाप्यात नाशिक येथील मे. मधुर फुड प्लाझा येथे छापा टाकून विक्रीसाठी प्लॉस्टिक डब्यांमध्ये साठविलेल्या श्रीखंड या अन्नपदार्थांच्या पॅकिंगची तपासणी केली. त्याच्या लेबलवर बॅच नंबर, उत्पादन केल्याची तारीख तसेच एक्सापयरी डेट व कुठे व कुणी उत्पादन केले त्याबाबतची माहिती नमुद न केल्याचे आढळल्याने त्या साठयातून नमुना घेवून उर्वरित शिल्लक साठा ६१.५ किलो हा लेबलदोषयुक्त असल्याने व अप्रमाणित असल्याच्या संशयावरुन साठा किंमत १८ हजार ४५० रुपये इतका प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केला.
ही कारवाई ही सहायक आयुक्त (अन्न) श्री विनोद धवड, उदयदत्त लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, श्रीमती सुवर्णा महाजन व अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.