इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या परिवर्तन क्षमतेवर भर दिला आणि जग तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता मूलभूतपणे आपल्या जगण्याची, कार्य करण्याची आणि संवाद साधण्याची पद्धत बदलेल आणि ही एक संधी आणि आव्हानही आहे यावर त्यांनी भर दिला. धनखड यांनी एआय चा उदय हा औद्योगिक क्रांतीनंतरच्या उत्पादनातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक असल्याचे नमूद केले.
आयआयटी, मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, उपराष्ट्रपतींनी त्यांना संशोधन आणि नवोन्मेषात गर्क राहण्याचे आणि सामाजिक कारणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले ज्यामुळे देशातील लोकांचे जीवन आणि मानवता सुलभ होऊ शकते.तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि सार्वत्रिकीकरण करता यावे यासाठी आयआयटी सारख्या प्रमुख संस्थांनी उद्योग आणि सरकार यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व जोखून, उपराष्ट्रपतींनी हजारो महिलांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या, त्यांना कष्टमुक्त करणाऱ्या आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या स्वच्छ भारत मिशन, उज्ज्वला योजना आणि हर घर जल योजनेसारख्या सरकारी उपक्रमांची प्रशंसा केली. अलीकडेच संसदेत मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक हे कालखंडातील विकास आहे, ज्यामुळे सामाजिक बदल दूरवर पोहोचतील असे त्यांनी नमूद केले.
युद्धाचे बदलते स्वरूप आणि धोरणात्मक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश यावर प्रकाश टाकत उपराष्ट्रपती म्हणाले की, “सर्वोत्तम संरक्षण म्हणजे टोकाचा बचाव करण्यास तुम्ही सक्षम असणे.” जगातील कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि राष्ट्राचे स्थान निश्चित करण्याची क्षमता केवळ ज्ञान या सर्वोच्च शक्तीमध्ये असून उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, 6जी , क्रिप्टोग्राफी, सायबर सुरक्षा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
लोकसंख्येच्या स्वरुपानुसार मिळणारा लाभांश आणि तरुणांची भूमिका अधोरेखित करून तरुणाई प्रशासनातील सर्वात मोठे भागधारक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. भारताचे भविष्य घडवण्याच्या युवकांच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि त्यांना विकासाचे प्रमुख इंजिन असे संबोधले.तरुण वर्गाने भारताचे अभिमानी नागरिक व्हावे, आपल्या देशाच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगावा आणि आपली जुनी नीतीमूल्ये आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहन धनखड यांनी केले.
मूल्यवर्धनाशिवाय आपल्या देशाचा कच्चा माल इतर देशांत जाण्याबद्दल चिंता व्यक्त करत आपण सगळ्यांनी आर्थिक राष्ट्रवादाची दृढ भावना विकसित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. मूल्यवर्धनाशिवाय कच्चा माल आपल्या देशातून इतर देशात पाठवल्याने आपले तरुण रोजगार आणि उद्यमशीलतेच्या संधीपासून वंचित राहतात, असे ते म्हणाले. भ्रष्टाचार हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगत भ्रष्टाचार सामान्य माणसाच्या विकासात अडथळा आणतो आणि लोकांना हताश करतो असे उपराष्ट्रपती म्हणाले.
तंत्रज्ञानाचा विकास एक उत्प्रेरक म्हणून काम करू शकेल आणि जागतिक नेतृत्व म्हणून भारताचा उदय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आयआयटी, उद्योग आणि सरकार यांसारख्या प्रमुख संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज विद्यार्थ्यांना संबोधित करताना धनखड यांनी अधोरेखित केली.
आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींनी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची समृद्ध परंपरा आणि विविध विषयांमध्ये त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान देखील अधोरेखित केले. माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य आणि संधींचा उपयोग धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये करता येईल, या अनुषंगाने सगळ्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांचा समावेश असलेली एक संस्था तयार करण्याची कल्पना त्यांनी मांडली या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,, प्रा. एस. सुदर्शन, उपसंचालक (एआयए), आयआयटी मुंबई , प्रा. के.व्ही. के. राव, उपसंचालक (एफईए), आयआयटी मुंबई, विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.