इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – भूतान आणि चीन यांच्यातील सीमा कराराच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने भारतासाठी तणाव निर्माण होणार होता; मात्र चीनमुळे भारत आणि भूतानच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि भूतान यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि सीमापार वाहतूक यांसारख्या अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. चीनसाठी हा मोठा धक्का असू शकतो.
भारत आणि भूतानमधील पहिल्या रेल्वे लिंकचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. दोन्ही देश आणखी एका रेल्वे लिंकचा विचार करत आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही नवीन करारांचे महत्त्व अधोरेखित करणारे संयुक्त निवेदन जारी केले. आजकाल भूतानच्या भूमिकेत बदल झाल्याची बरीच चर्चा होती. भूतान आणि चीन सीमावादावर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असून त्यांना यश मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता भारत आणि भूतानचे वाढते संबंध पाहता भूतान चीनसोबत असा कोणताही करार करणार नाही, ज्यामुळे भारताचे नुकसान होईल. भूतानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मोदी यांनी जिग्मे खेसर यांना दिले आहे. याशिवाय आसाममधील कोक्राझार आणि भूतानमधील गेलेफू दरम्यान बांधल्या जाणाऱ्या रेल्वे लिंकच्या अंतिम लोकेशन सर्व्हेबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे. या रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरू होऊ शकते.
दोन्ही देशांनी पश्चिम बंगालमधील बनारहाट आणि भूतानमधील सामत्से दरम्यान रेल्वे मार्ग बांधण्याचा विचार केला आहे. यामुळे भूतान आणि बांगला देश यांच्यातील व्यापारही सुलभ होईल. भारतीय रेल्वेने भारत-भूतान रेल्वे लिंकचे काम सुरू केले आहे. भारतीय रेल्वेने कोक्राझार आणि गेलेफू दरम्यानचा ५७ किलोमीटरचा प्रारंभिक मार्ग पूर्ण केला आहे. याशिवाय व्यापार अधिक बळकट करण्यासाठी दादागिरी चेक पोस्ट अपग्रेड करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.