इंडिया दर्पण वृत्तसेवा
तामिळनाडू मर्कंटल बँकेने एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात चुकीने ९ हजार कोटी जमा केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या धनलाभाने कॅब ड्रायव्हर कोट्यधीश झाला असतानाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कृष्णन यांनी राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे.
काही दिवसांपूर्वी बँकेच्या चुकीमुळे एका कॅब ड्रायव्हरच्या बँक खात्यात ९ हजार कोटी जमा झाले. या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कृष्णन यांनी राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजीनामा देणे आणि त्या घटनेचा काहीही संबंध नाही असे कृष्णन यांनी स्पष्ट केले आहे. कृष्णन यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, “माझ्या कार्यकाळाचा अंदाजे दोन तृतीयांश कालावधी बाकी असला तरी, वैयक्तिक कारणांमुळे मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णन यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये बँकेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. थुथुकुडीस्थित बँकेच्या संचालक मंडळाने गुरुवारी एक बैठक घेतली आणि त्यांचा राजीनामा स्वीकारुन तो भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठवला. नवीन व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत एस कृष्णन या पदावर राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी कॅब ड्रायव्हर राजकुमारच्या खात्यात ९ हजार कोटी रुपये जमा झाले. सुरुवातीला राजकुमारला यावर विश्वास बसला नाही. सत्यता तपासण्यासाठी राजकुमारने त्याच्या मित्राला २१ हजार रुपये ट्रान्सफर केले, यानंतर त्याचा विश्वास बसला. मात्र, काही वेळातच बँखेने उर्वरित रक्कम परत घेतली.