इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकत दणदणीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत भाजपा – शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने १४०० पेक्षा अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात सोमवारी मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार,विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर आदींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
राज्यात ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत एकट्या भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक जागा जिंकत राज्यात आपणच नंबर एक असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी व्यक्त केली.भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या विजयोत्सव कार्यक्रमावेळी आ. शेलार पत्रकारांशी बोलत होते.
भाजपाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे सकारात्मक राजकारण केले आहे. या राजकारणाला ग्रामीण भागातील जनतेने अनुकूल कौल दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उठसुठ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस हे मार्गी लावतील,असा विश्वास सामान्य माणसाला वाटतो असे या निवडणुकीतून दिसले,असेही आ. दरेकर यांनी नमूद केले.