नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात आजमितीस असलेला धरणसाठा विचारात घेवून ऑगस्ट २०२४ अखेर पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन सादर करावे असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण निश्चिती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, ॲड.माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड.राहुल आहेर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, नितिन पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. परतीचा पाऊसही पुरेसा झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण होत असून काही तालुके शासनाने दुष्काळी घोषित केले आहेत. त्यामुळे धरण समूहातील पाणीसाठ्याचे काटकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे. मध्यम व मोठे प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेवून नियोजन करावे. हे करतांना एकूण लोकसंख्येनुसार पाण्याची आवश्यकता, जनावरांसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहतींना लागणारे पाणी, औद्योगिक वसाहतीत आलेले नवीन प्रकल्पांची संख्या, शेती व फळबागांसाठी लागणारे पाण्याची मागणी याबाबी सुक्ष्मपणे लक्षात घेणे आवश्यक आहे.
आजच्या वस्तूस्थितीनुसारच फेरनियोजनाची आकडेवारी निश्चित केलेली असावी. भविष्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या. बैठकीत लोकप्रतिनिधींनी पाण्याबाबत मौलिक सूचना केल्या. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारत घेवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचित केले.