दीपक ओढेकर, नाशिक
नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराथीने आइल् ऑफ मॅन (Isle of Man ) या ब्रिटन आणि आर्यलंड यामध्ये वसलेल्या छोटयाशा शहरात कालच संपलेल्या जगातील सर्वात महत्त्वाच्या अशा ग्रांड स्विस स्पर्धेत ऐतिहासिक असे विजेतेपद मिळ्वून बुद्धिबळविश्वात मोठी खळबळ माजवून दिली ! मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी एक दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते कारण यातील विजेता आणि उपविजेता हे फक्त सर्वोत्कृष्ट अशा आठ खेळाडूंसाठीच असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील
.
एकूण ११ फेऱ्या असलेल्या या ग्रां स्विस स्पर्धेत जगातील आघाडीचे ११४ खेळाडू उतरले होते आणि त्यात विदितने सर्वातजास्त ११ पैकी ८:५ ( साडेआठ) गुण मिळवले ज्यात तब्बल ७ विजय, तीन बरोबरी आणि एक पराभव समाविष्ट आहे. अत्यंत कौतुकाची आणि विदितच्या लढवय्ये पणाची गोष्ट म्हणजे स्पर्धेतील पहिलाच सामना विदीत ( एलो रेटिंग २७१५) त्याच्यापेक्षा कमी रेटिंग असलेल्या नेदरलँड्सच्या अर्लीन लामिशी ( एलो रेटिंग २६२७) अनपेक्षितरित्या हरला आणि तरीही पुढील सलग तीन सामने भारताचा अभिजीत गुप्ता, जर्मनीचा दिमित्री कोलार्स आणि स्पेनचा बुजुर्ग खेळाडू ॲलेक्स शिरोव यांच्याविरुद्ध जिंकून त्याने आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळविला व गाडी रुळांवर आणली ! त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याच्या पुढील सात लढतीत काही कठीण टप्पे येणार होते त्यालाही जिगरबाज विदितने हिमतीने तोंड दिले. सहाव्या फेरीत इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरून कार्लसन विरूध्द खेळून बदनाम झालेला अमेरिकन हान्स निमन, आठव्या फेरीत सुमारे ६५ एलो रेटिंगने विदीतच्या पुढे असलेला हिकारु नाकामुरा आणि नवव्या फेरीत रशियाचा आंद्रे एसिपेंकोच्या रुपाने आले पण विदितने हुशारीने सगळे हल्ले परतून लावले. नाकामुरा आणि एसिपेंको या बलवान खेळाडूबरोबर झालेली बरोबरी हा डावपेचाचा एक भागच असावा कारण नजरेच्या टप्प्यात आलेले विजेतेपद दिसत असताना त्याला धोका पत्करून चालणार नव्हते.
विदितच्या या साहसी पण कल्पक खेळाने विदित सहाव्या फेरीपासून जो पहिला आला तो त्याने पुढील चार फेऱ्यात संयुक्त प्रथम स्थान कायम टिकून ठेवले आणि अखेरच्या अकराव्या फेरीत तुलनेने दुबळ्या पण धाडसी आणि आक्रमक अशा अलेक्झांडर प्रेडले (एलो २६५६) ला पराभूत करून एक महान यश संपादन केले . विदित स्वतःच म्हणाला, खूप दिवसात मी एखादी स्पर्धा जिंकत आहे, त्याचा आनंद आहेच पण पहिला डाव हरुन देखील मी विजेता झालो आणि तेही जगातील सर्व अव्वल खेळाडू स्पर्धेत असताना याचा आनंद अधिक आहे !
२९ वर्षीय विदितच्या सुमारे २० वर्षांच्या कारकिर्दीतील हा परमोच्च बिंदू मानता येइल. यापूर्वी त्याने आशियाई उपविजेतेपद,., १४ वर्षाखालील विश्व विजेतेपद आणि १६ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत उपविजेतेपद, तसेच भारतीय कर्णधार म्हणून २०२० साली झालेल्या चेस ओलिंपियाड मध्ये भारताला विजेतेपद मिळवुन दिले तर अलीकडे चीन मधील हॅंगझाऊ येथील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले तरीही ग्रांड स्विस स्पर्धेतील वैयक्तिक विजेतेपदाची झळाळी काही वेगळीच आहे ! विदितच्या सुदैवाने त्याला संपूर्ण ११ फेऱ्यात त्याच्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या फक्त एकाच – अमेरिकन हिकारु नाकामुरा- खेळाडूशी सामना करावा लागला पण त्यामुळे त्याने मिळविलेले यश आजिबात कमी महत्त्वाचे होत नाही.
इतक्या उच्च दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याचे दडपण काही वेगळेच असते त्यामुळे समोर कोण खेळाडू आहे आणि त्याचे रेटिंग कमी आहे की जास्त आहे हे आजिबात महत्त्वाचे नसते. रेटिंग कमी असलेले खेळाडू देखील उच्च दर्जाचा खेळ खेळतात. त्यांना कमी लेखून चालत नाही ! ( आपण विश्वचषक क्रिकेटमध्ये पाहतच आहोत की अफगाणिस्तान संघ रथी महारथी संघांना चितपट करीत आहे ).. या ऐतिहासिक विजयाने विदितचे २७१५ हे ऑक्टोबर अखेरीस असलेले रेटींग घसघशीतपणे वाढून ते आता २७३७:४ झाले आहे आणि तो जगात २८ क्रमांकावरुन १६ व्या क्रमांकावर आला आहे तर भारतात त्याने तिसऱ्या क्रमांकावर ( पहिला अर्थातच विश्वनाथ आनंद आणि दुसरा प्रद्न्यानंदनन ) झेप घेतली आहे ! तसेच कॅंडीडेट्स साठी पात्र होणारा आनंद आणि पी हरिकृश्न नंतर तिसराच भारतीय खेळाडू झाला आहे, यावरून आपल्याला विदितच्या या विलक्षण आणि दुर्मिळ यशाचे महत्त्व लक्षात यावे !